विडंबन


प्रेमवीर 
तिच्या 'त्या' नकाराने 
प्रेमवीर पुरता खचला;
दोन- चार दिवस
 गप्प गप्प बसला !
     तिच्या होकारार्थ त्याने
    काय - काय केले नाही ?
   पण तिला  त्याची साधी
    दया सुधा आली नाही !
"प्रेमावरच हे सारे
जग- जीवन चाले ;
मग  माझ्याच नशिबी
हे अपयश का आले ?"
      असा विचार करूनि
      तो खंत करू लागला ;
      अन अचानक त्याला
      जणू परीसच सापडला!
"गीतेचे ते तत्वज्ञान
कसा गेलो विसरून ?
मुर्खासम वागलो
राहिलो कसा अजाण ?
     'फळाची अपेक्ष न धरता
      निष्काम कर्म करावे '
     मग मीच असे का
     व्यर्थ झुरूनि मरावे ?
येत विचार मनी हा
प्रेमवीर  प्रसन्न झाला.
नव्या उत्साहाने पुन्हा
नव्या स्वारीवर निघाला !
                 ---- विश्वकुमार.
  

शिंक
( मरण या कवितेचे विडंबन )
मला माहित आहे;
शिंक  माझ्या
नाकावर आली आहे !
म्हणून तिला म्हणालो मी ,
" थांब जरा , लुटू दे  मला 
मजा या गप्पांची !
शिंकणारच आहे मी ,
एवढी  घाई कशाला ?
आता कुठे तरी  मी
या गप्पांमध्ये 
रंगत आहे;
आणि फेकी वर फेकी
फेकत आहे !
त्या अशा निर्दयीपणे 
थांबवू नकोस !
शिंकातातच सगळे ;
पण  अशा या
आनंदाच्या प्रसंगी
माझा हिरमोड
करू नकोस ! "
                      -विश्वकुमार.


फक्त तुझ्यासाठीच...
[ सदर कविता हि  या प्रकारच्या सर्व कवितामध्ये सर्वात जुनी असून इतर सर्व कवितात याचेच अनुकरण करण्यात आले आहे. तथापि त्या संबंधीची सर्व कागदपत्रे आता गहाळ झाली आहेत.तरीही सुज्ञ वाचकांच्या ध्यानात  ही गोष्ट आल्यावाचून राहणार नाही, म्हणून ही  प्रस्तावना करत आहे.]
फक्त तुझ्यासाठीच...
माझे रोज पहाटे आठ वाजता उठणे -
                 फक्त तुझ्यासाठीच आहे.
माझे रोज तेच तेच दात घासणे-
                  फक्त तुझ्यासाठीच आहे.
माझे आठवड्यातून एकदा दाढी  खरवडणे-
                 फक्त तुझ्यासाठीच आहे.
माझे बादलीभर पाण्यात अंग बुचाकाळणे-
                  फक्त तुझ्यासाठीच आहे.
माझे तासभर आरशासमोर के शेकारणे-
                  फक्त तुझ्यासाठीच आहे.
माझे उठणे, बसणे, हसणे ,गाणे -
                  फक्त तुझ्यासाठीच आहे.
माझे तासनतास  विचारमग्न होणे-
                 फक्त तुझ्यासाठीच आहे.
माझे 'तू माझीच आहेस ' असा विचार करणे-
               फक्त तुझ्यासाठीच आहे.
काय म्हणता , "कोण आहे ही?"
          अहो ही तर माझी आत्मप्रतिमा -'मी'!
माझे सर्व काही फक्त माझ्यासाठीच आहे!   
                                                                -विश्वकुमार